रोजच्या जेवणात अशी काय व्हरायटी लागते? भाजी-चपाती आणि वरण-भात. त्यात चवीचा काय विषय? रोजचं जेवण खिशाला परवडणारंच पाहिजे. मग त्यात तेल कुठलं वापरलंय आणि भाजी कुठून घेतलीय या गोष्टी कुठं बघत बसायच्या? परवडणाऱ्या टिफीनमध्ये सर्व्हीसची अपेक्षा कुठं करत बसायची? काम करताना जेवणाची वेळ झाली की पोटात चार घास ढकलायचे, त्यात विचार कसला करायचा? वगैरे वगैरे…
स्वतःचं घर, गाडी, मुलांचं शिक्षण, औषधं, सण-कार्यक्रम, पर्यटन, कर्जाचे हप्ते, आणि इन्शुरन्सचे प्रिमियम, या गोष्टी महत्त्वाच्या असल्या तरी, अल्टीमेटली माणूस काम करतो कशासाठी, तर त्याचं उत्तर आहे - पोटासाठी! मग त्याच पोटात रोज काय ढकलतोय त्याकडं एवढं दुर्लक्ष का? कधीतरी हॉटेलमध्ये जेवायला गेल्यावर ऑर्डर काय द्यायची यावर चर्चा होते. सण-समारंभाला मेन्यू काय ठरवायचा यावर चर्चा होते. पण रोजच्या रोज आपलं इंजिन रनिंग ठेवण्यासाठी लागणाऱ्या इंधनावर, अर्थात रोजच्या टिफीनवर आपण किती चर्चा करतो?
जगप्रसिद्ध ऑपेरा सिंगर लूचियानो पावरोटी एकदा म्हणाले होते की, "आपल्या आयुष्यातली एक खूपच चांगली गोष्ट म्हणजे, आपण जे काही करत असू ते नियमितपणे आपल्याला थांबवावं लागतं आणि आपलं पूर्ण लक्ष खाण्याकडं वळवावं लागतं!"