कडव्या वालाचं बिरडं हा आमच्या घरातला एक खास आणि प्रेमाचा पदार्थ. लहानपणी हा पदार्थ बनवणं म्हणजे आमच्यासाठी एक छोटासा सणच असायचा. घरात उत्साहाचं वातावरण निर्माण व्हायचं. “बिरडं करायचंय” असं आई म्हणाली की आम्ही सगळे खूश व्हायचो.
वाल म्हणजे कडधान्याचा एक प्रकार. पावटा आणि वाल दोन्हीचे दाणे सारखेच दिसतात. पावट्याला ‘गोडे वाल’ असंसुद्धा म्हणतात. वालाची चव थोडी कडवटसर असते, ज्यामुळं कडव्या वालाचं बिरडं चवीला वेगळं आणि विशेष लागतं.
वालाचे दाणे इतर कडधान्याप्रमाणे पाच ते सहा तास भिजवून मोड येण्यासाठी कपड्यामध्ये रात्रभर बांधून ठेवायला लागतात. थंडीच्या दिवसांमध्ये मोड यायला अधिक वेळ लागतो. चांगले मोड आले की त्याला गरम पाण्यामध्ये तासभर भिजवून ठेवायचं, मग त्याची सालं मोकळी होतात. एक-एक करून प्रत्येक वालाच्या बियांची सालं काढायची. या सोललेल्या वालांना ‘बिरडं’ किंवा ‘डाळिंब्या’ म्हणतात.
बिरडं तयार व्हायला तीन दिवस लागायचे. पहिल्या दिवशी आई वाल भिजवायची. दुसऱ्या दिवशी ते वाल मोड आणण्यासाठी बांधून ठेवायची आणि छान मोड आले की सकाळीच ते कोमट पाण्यात घालून ठेवायची. मग वाल सोलायचे आणि तिसऱ्या दिवशी बिरडं शिजवायचं. या सगळ्या प्रक्रियेत आम्हा मुलांचा आणि मोठ्यांचाही सहभाग असायचा. विशेष म्हणजे वाल सोलणं हा एक सामूहिक कार्यक्रम असायचा. आई, बाबा, आजी, आम्ही भाऊ-बहीण, सगळे मिळून बसायचो आणि गप्पा मारत मारत वाल सोलायचो.
आई बिरडं बनवताना खूप काळजी घ्यायची. नारळ खवून घ्यायचा, त्याचं मेणासारखं बारीक वाटण तयार करायचं. कांदा मंद आचेवर परतायचा आणि मग त्यावर डाळिंब्या परतायला घातल्या की जो सुगंध घरात पसरायचा.. आहाहा! चिंच-गूळ नारळ आणि आलं-लसूणाचं वाटण आणि वालाची चव.. वाह!
आजही वालाचं बिरडं खाल्लं की लहानपणीच्या आठवणी ताज्या होतात. तो एक पदार्थ नसून एक भावना आहे - एकत्र कुटुंबाची, प्रेमाची आणि आठवणींची. त्या चवीत फक्त मसाले नाहीत, तर आपल्या माणसांचा सहवास, गप्पा, आणि खूप साऱ्या आठवणी मिसळलेल्या आहेत.
कडव्या वालाचं बिरडं हे एक चविष्ट, पौष्टिक आणि मनापासून जपलेलं प्रेमाचं प्रतीक आहे. म्हणूनच नावाला कडवं असलेलं बिरडं म्हणजे फक्त जेवणातला पदार्थ नसून गोड अनुभवांची मेजवानी आहे.
~ शर्मिष्ठा गुप्ते-शिंदे
खावाकी फूड्स, पुणे
