'खावाकी फूड्स'च्या वाटचालीत 'कोथरूड मित्र'चा मोलाचा वाटा
महिला उद्योजक शर्मिष्ठा गुप्ते-शिंदे यांचे प्रतिपादन
कोथरूड मित्र: पुणे; १६ ते ३० नोव्हेंबर २०२४
---
पुणेकरांचे खाद्यप्रेम जगभरात प्रसिद्ध आहे. मात्र चोखंदळ पुणेकरांच्या पसंतीला उतरणे सोपे नाही. दर्जा, वैविध्य, वक्तशीरपणा आणि तुमच्या पसंतीचे खाद्यपदार्थ तुमच्या दारात पोहोचविण्याची तत्परता या गुणांमुळे पहिल्यांदा कोथरूड वासियांची मने जिंकण्याची आणि मग समस्त पुणेकरांबरोबरच आता देशभरातील खवय्यांची पसंती मिळविण्याची किमया 'खावाकी फूड्स'ने साधली आहे.
'खावाकी फूड्स'ने गेल्या १४ वर्षांच्या वाटचालीत केलेल्या आश्चर्यकारक प्रगतीत 'कोथरूड मित्र' वृत्तपत्राचा मोलाचा वाटा असल्याचे संस्थापक-संचालिका शर्मिष्ठा गुप्ते शिंदे यांनी म्हटले आहे. उदित फाऊंडेशनसाठी डॉ. हेमांगी कडलक यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपल्या यशाचे श्रेय 'कोथरूड मित्र' पाक्षिकाला दिले आहे.
आयटी कंपनीत दशकभरापेक्षा जास्त काळ नोकरी केल्यानंतर शर्मिष्ठा मॅडम यांनी त्याच अनुभवातून खाद्यपदार्थ उद्योगात उतरण्याचे ठरविले. त्यावेळी कॉर्पोरेट विश्वातील महिलांच्या अनियमित वेळापत्रकामुळे त्यांना स्वयंपाक वगैरे करणे शक्य होत नव्हते. परंतु पिझा, बर्गरसारख्या गोष्टींशिवाय बाकी काही पार्सलद्वारा मिळत नव्हते. म्हणून त्यांनी महाराष्ट्रीय पदार्थ बनविण्याचा व सर्व ठिकाणी पुरविण्याचा व्यवसाय सुरू केला.
कामगिरी सोपी नव्हती, त्यांना प्रतिसादही चांगला मिळत होता, परंतु कोथरूडमधील भुसारी कॉलनी परिसरात राहात असलेल्या शर्मिष्ठा मॅडम यांना 'खावाकी फूड्स'च्या विस्तारासाठी आणि कोथरूडमधील नागरिकांपर्यंत पोहोचण्याकरिता योग्य माध्यमाची गरज होती. 'कोथरूड मित्र'ने आपली ही गरज पूर्ण केली. इतकेच नव्हे तर आमचा व्यवसाय सर्वदूर पोहोचविला, अशी प्रांजळ कबुली शर्मिष्ठा मॅडम यांनी दिली आहे.
'कोथरूड मित्र'चे वितरण अत्यंत चोख आणि भरवशाचे असल्यामुळेच मला लाखो नागरिकांपर्यंत पोहोचता आले, असे सांगून शर्मिष्ठा मॅडम म्हणाल्या, की मी २०१० मध्ये व्यवसायाची सुरुवात केली, तेव्हा सोशल मीडिया उपलब्ध नव्हता. तसेच हॅन्डबिलांद्वारे ग्राहकांपर्यंत पोहोचणे खूपच अवघड, बेभरवशाचे आणि खर्चिक होते. त्यामुळे मार्केटिंगचे काय करायचे, असा आमच्यासमोर प्रश्नच होता. परंतु 'कोथरूड मित्र'मुळे 'खावाकी फूड्स'चा व्यवसाय अल्पावधीतच हजारो परिवारांपर्यंत पोहोचला.
वाचकांचा 'कोथरूड मित्र'वरील विश्वास सातत्याने सिद्ध होत गेला, असे सांगून शर्मिष्ठा मॅडम म्हणाल्या, की केवळ एकदा जाहिरात केली, तरी त्यानंतर दोन-तीन महिन्यांपर्यंत त्यासाठीचे फोन येत असत. नंतर मी 'कोथरूड मित्र' मध्ये नियमित जाहिरात सुरू केली आणि त्याचे फळ मला मिळाले. मिळणारा भरघोस प्रतिसाद पाहून आम्ही हळुहळू मोदक, पुरणपोळी असे खास पदार्थ सुरू केले. इतकेच नव्हे तर फूड चार्ट आणि मेन्यू कार्डही तयार केले.
दरम्यान 'खावाकी फूड्स'चा विस्तार वाढला होता. कात्रज परिसरात स्वतःच्या मालकीच्या घरात स्थलांतर केल्यावर शर्मिष्ठा मॅडम यांनी कोंढवा भागात स्वतःचा कारखाना सुरू केला. त्या ठिकाणी उत्पादन आणि पॅकिंग सुरू केले. स्वतःच्या विविध रेसिपीज डेव्हलप केल्या. कुशल कर्मचाऱ्यांची भर 'खावाकी' परिवारात पडत गेली आणि व्यवसायाने लवकरच मोठे स्वरूप धारण केले.
याच काळात कोविड महासाथीमुळे संपूर्ण जग थांबले. लॉकडाऊनच्या काळात अनेकांनी बाकी पर्याय नसल्याने अर्थार्जनासाठी फूड प्रॉडक्ट्सचा व्यवसाय सुरू केला. परिणामी 'खावाकी फूड्स' सारख्या नियमित व्यावसायिकांना त्याचा फटका बसला. अर्थात कोविडच्या काळानंतर त्यातूनही सावरण्याची किमया शर्मिष्ठा मॅडम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी करून दाखविली.
आता 'खावाकी फूड्स'ने पुन्हा एकदा झेप घेतली आहे. उत्तम दर्जा आणि कमालीचा वक्तशीरपणा यामुळे केवळ पुण्यातीलच नव्हे, तर देशभरातील ग्राहकांकडून त्यांना ऑर्डर्स येत असतात. डन्झो, स्विगी, झोमॅटो यांच्या मदतीने संपूर्ण पुण्यातील ग्राहकांची सेवा करीत असताना प्रमुख शहरांमधून आलेल्या ऑर्डर्सही कुरिअरच्या साहाय्याने वेळेत पूर्ण करून दाखविल्याने त्यांना प्रचंड मागणी आहे.
ग्राहकांना उत्तम सेवा देता यावी, याकरिता प्रासंगिक मागणीसाठी एक दिवस, तर ३०-४० माणसांच्या समारंभासाठी किमान आठ-दहा दिवस आगाऊ ऑर्डर स्वीकारण्याचे त्यांचे धोरण आहे. गौरी-गणपती किंवा दिवाळीसारख्या सणांसाठी तर एक-दोन महिने अगोदरच मागणी नोंदविण्याची त्यांच्या ग्राहकांनाही सवय झाली आहे. अनेक ग्राहक दहा- बारा वर्षांपासून नियमितपणे 'खावाकी फूड्स'मधूनच विविध खाद्यपदार्थ मागवीत असल्याचे शर्मिष्ठा मॅडम यांनी नमूद केले.
'खावाकी फूड्स'च्या भविष्यातील नियोजनाबद्दल शर्मिष्ठा मॅडम म्हणाल्या, की व्यवसाय विकास सल्लागार, विविध खाद्यपदार्थ तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी स्वतंत्र विभाग, हॉटेल मॅनेजमेंटसारख्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण व इंटर्नशिपची सोय करणे अशा विस्ताराच्या विविध योजना तयार आहेत. आगामी काळात टप्प्याटप्प्याने या योजना प्रत्यक्षात आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.
गेल्या २१ वर्षांत कोथरूड परिसरातील शेकडो व्यावसायिकांच्या वाटचालीत सहभागी होऊन अक्षरशः शून्यापासून सुरुवात करून त्यांचा व्यवसाय प्रचंड यशस्वी होण्यापर्यंत त्यांना साहाय्य करण्याचे काम 'कोथरूड मित्र'ने केले आहे. या कामगिरीचेच प्रतिबिंब शर्मिष्ठा मॅडमच्या मनमोकळ्या मुलाखतीतून उमटले आहे. आमच्या असंख्य जाहिरातदारांच्या यशात वाटेकरी असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो. 'खावाकी फूड्स' आणि शर्मिष्ठा मॅडम यांनाही भविष्यातील भरघोस यशासाठी 'कोथरूड मित्र' परिवाराच्या हार्दिक शुभेच्छा !
खावाकी फूड्स
फोन: ९५५२५८०३२१
No comments:
Post a Comment